जालना - ग्राहक बनून आलेल्या चोरट्यांनी पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून विराज बार अँन्ड रेस्टॉरेंट लुटले आहे. ही घटना जालना-औरंगाबाद हायवेवरील सेलगाव परिसरात बुधवारी रात्री साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. यावेळी चोरट्यांनी 67 हजार 580 रूपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी सेलगाव येथील घटना पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासर्व प्रकाराचा व्हिडिओ हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पिस्तुलचा धाक दाखवून लुटला बार -
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील बार चालक शिवाजी रामराव अंभोरो यांनी पोलिसात तक्रार दिली आहे की, अंदाजे 30 ते 35 वयातील दोन व्यक्ती हे बुधवारी रात्री साडेसहाच्या दरम्यान दारू पिण्यासाठी बारमध्ये आले. त्यांच्या तोंडाला मास्क आणि डोक्याला कापड बांधलेले होते. एकाच्या अंगावर निळा टी शर्ट व निळी पॅन्ट तर दुसऱ्याच्या अंगावर काळा टी शर्ट व काळी पॅन्ट होती. दोघांनीही दारू पिली आणि दुकानात असलेले कर्मचारी, ग्राहक, पिग्मी एजंट यांना पिस्तुल व चाकुचा धाक दाखवून सर्वांच्या खिश्यातील मोबाईल, नगदी रोख रक्कम आणि 6 दारूच्या बाटल्या असा 67 हजार 580 रूपयांचा माल लुटला.
गुन्हा दाखल -
बार चालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामोड करत आहेत.
हेही वाचा - विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा विनयभंगाचा गुन्हा, नागपूर खंडपीठाचा निर्णय