जालना - चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सुंदरनगर येथील पवार बंधुंची दोन घरे फोडून चोरट्यांनी 15 लाखांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे चंदंनझिरा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हे घर आहे.
चंदंनझिरा पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस सुंदरनगर ही वस्ती आहे. मुख्य रस्त्यावर प्रभाकर माधवराव पवार आणि प्रशांत पवार या दोन सख्ख्या भावांची शेजारी-शेजारी घरे आहेत. घरांच्या मागे आणि पुढे दोन्ही बाजूला मुख्य रस्ते आहेत, असे असताना देखील दिनांक 6 च्या रात्री चोरट्यांनी डल्ला मारून दोन्ही घरातील रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 15 लाखांचा ऐवज लंपास केला. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच हे घर आहे.
चोरीला गेलेला ऐवज
दीड तोळा वजनाचे सोन्याचे लॉकेट
तीन तोळे वजनाच्या सोन्याचे गंठण
एक तोळा वजनाचे गंठण
5 ग्रॅम वजनाचे झुंबर
चार ग्रॅम वजनाची ठुशी
पाच ग्रॅम वजनाचे वेल
पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि दोन्ही घरातून सुमारे चार ते पाच लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे पंधरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
तपास सुरू
चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत लक्षात घेता पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे जलद केली आहेत. ठसे तज्ञ आणि श्वानपथकाला ही पाचारण करण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा कोणताही तपास लागला नाही. दरम्यान, प्रभाकर माधवराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदंनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.