जालना - पोळा सण कुटुंबीयांसमेवत साजरा करायला निघालेला तरूण कुंडलीका नदीपात्रात वाहून गेला आहे. पाण्याचा आणि पुलाचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याची घटनास्थळी उपस्थित नागरिकांची माहिती आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून शोध मोहीम सुरू असून अद्याप या तरुणाचा शोध लागलेला नाही.
मागील ४ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील कुंडलीका नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. अशातच सोमवारी सायंकाळी ५ वाजता ऋषिकेश नाटकर दुचाकीवरून जालन्याहून घनसांगीकडे निघाला होता. दरम्यान, जालना - मंठा बायपास रस्त्यापासून बरडीकडे जाणाऱ्या छोट्या पुलावरून जात असताना पूल आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेल्याची घटना समोर आली होती. नदीकाठावर उभ्या असलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला. मात्र, तोपर्यंत ऋषीकेश दूर पर्यंत वाहून गेला होता.
यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे. मागील दोन दिवसापांसून ही शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी देखील या पात्राच्या परिसरात सारवाडीपर्यंत तरुणाचा शोध घेतला. मात्र, अद्याप या तरुणाचा शोध लागलेला नाही. दरम्यान, नातेवाइकांच्या मदतीने आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्याप या तरुणाचा शोध लागला नाही. पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी घरी निघालेला हा तरूण अशा पद्धतीने बेपत्ता झाल्याने, नाटकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या : 'मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह म्हणजे षडयंत्र'