जालना - बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी गाव सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात गेले. पुनर्वसन होऊन ५६ वर्षे उलटूनही हे गाव कोणत्या ठिकाणी पुनर्वसित झाले याबाबत जालना जिल्ह्याच्या नकाशात अधिकृत नोंद नाही. त्यामुळे नागरिकाना झोन चारचे दाखले मिळत नाही. यामुळे दुधनवाडीच्या गावकऱ्यांनी कुटुंबियांसह व गावातील गुरा-ढोरांसह प्रजासत्ताक दिनी दुधना प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्प सन १९५९ साली मंजूर झाला होता. १९६० मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. या प्रकल्पामध्ये जालन्यातील दुधनवाडी, व औरंगाबादमधील ढवळापुरी या दोन गावांचे पुनर्वसन करण्यात आले. दुधनवाडी गावातील सर्व गावकऱ्यांनी शासनाच्या आदेशाला संमती देऊन स्वत:च्या जमिनी व घरे स्वखुशीने दिली. १९६४ मध्ये या गावाचे पुनर्वसन सोमठाणा येथील सर्वे क्रमांक ९० व गट क्रमांक ३५४ मध्ये करण्यात आले.
५४ वर्षानंतरही नकाशावर नाही
१९६४ साली पुनर्वसित झालेले दुधनवाडी हे गाव ५४ वर्षानंतरही जालना जिल्ह्याच्या नकाशावर आलेच नाही. या बाबत या गावातील नागरिकांनी वारंवार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, आमदार-मंत्री यांना निवेदने देऊन बैठका घेतल्या. दुधनवाडी येथील झोन-४चा दाखला मागितला तर त्यांच्याकडून या गावाचे अतिक्रमण झाले आहे, अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे शासनाच्या विविध सवलती, बँक कर्ज आदी या गवाकऱ्यांना मिळत नाही.
चुकीचे कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा -
१९६४ पासून पुनर्वस कामासाठी शासनाचे करोडे रुपये खर्च केले. मात्र, खोटे पुनर्वसन दाखवून काही अधिकाऱ्यांनी चुकीचे कामे केली. या सर्व प्रकारात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिला जलसमाधीचा इशारा -
चुकीचे कामे करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी, सदरील गाव जालना जिल्ह्याच्या नकाशावर घ्यावे, तसेच झोन-४ प्रमाणे आम्हाला दाखले देण्यात यावे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत. जर, या मागण्या मान्य झाल्या नाही तर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दुधनवाडीतील गावकरी कुटुंबियांसह व गावातील गुरा-ढोरांसह जलसमाधी घेऊ, अशा इशारा गावकऱ्यांनी दिला.
प्रशासन व मंत्र्यांना पाठवल्या प्रती -
ब्रदीनाथ पठाडे, प्रवीण पडूळ, लक्ष्मण शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह गावकऱ्यांच्या स्वाक्षरीने या बाबतचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्याच्या प्रती पालकमंत्री, केंद्रीय मंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत.