जालना - टास्क फोर्सने सांगितल्या प्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही. त्याचा मोठा परीणाम होणार नाही, असे अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. अमेरिका, युरोपमध्ये तिसरी लाट आली पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही. मात्र, लसीकरणामुळे कोरोनाची दाहकता कमी करता येऊ शकते, असेही ते म्हणाले.
कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने 'मिशन कवचकुंडल' अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत राज्यात दररोज 15 लाख जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पण, राज्यात लसींचा साठा उपलब्ध असतानाही शुक्रवारी (दि. 9 ऑक्टोबर) राज्यात 15 लाख लसींचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. याबद्दल टोपे यांनी स्पष्टीकरण दिले असून सुरू असलेला पावसामुळे ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचता येत नाही. पण, यासंदर्भात अधिकाऱ्यांची दोनवेळा बैठक घेण्यात आली असून लसीकरण करणे हे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे टोपे यांनी म्हणाले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
...तर शालेय शिक्षण विभाग निर्णय घेईल
परभणी जिल्ह्यात एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याने शाळा 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाला आरोग्य विभागाने काही सूचना केल्या असून आणखी अशी घटना घडल्यास शालेय शिक्षण विभाग त्या सूचनेनुसार निर्णय घेईल, असे टोपे म्हणाले.
लसीकरण अन् चाचणी वाढवण्याच्या सूचना
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी तिथे काळजी करण्याची गरज नाही. तिथे लसीकरण वाढवण्यासोबतच चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा - शाळांनी स्वयंशिस्त पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी - आरोग्य मंत्री राजेश टोपे