जालना - राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प 30 नोव्हेंबरला बंद करण्यात आला आहे. 2004ला श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. प्रकल्प बंद झाल्याने प्रकल्पाअंतर्गत काम करणाऱ्या 250 महिलांचा रोजगार हिरावला गेला आहे. गेल्या सात महिन्यांपासून या महिलांचे मानधन थकित असल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रकल्पामध्ये कायमस्वरूपी होण्याच्या आशेवर सहा हजार रुपये मानधन घेऊन 180 शिक्षिका, 56 शिपाई आणि अन्य काही कार्यालयीन कर्मचारी कार्यरत होते. प्रकल्प बंद पडणार असल्याची कुठलीही पूर्वसुचना न देता अचानक कार्यमुक्त केल्याने हे कर्मचारी संतप्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये सर्व महिला शिक्षिका आहेत.
हेही वाचा - जालन्यात कामगारांचा मोर्चा ; विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
यापूर्वीही कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत राहण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतू आता कार्यमुक्त झाल्यानंतर आधीच्या सात महिन्यांचे मानधनही या महिलांना मिळालेले नाही. दरम्यान, या प्रकल्पाची धुरा सध्या सहा कर्मचाऱ्यांवर आहे. ज्यामध्ये प्रकल्प प्रमुख म्हणून मनोज देशमुख हे काम पाहत आहेत. थकीत मानधन दिले गेले नाही तर, आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.