जालना - कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येही बदनापूर शहरात स्वच्छता असावी म्हणून स्वच्छता कर्मचारी दिवसभर काम करतात. स्वच्छतेसाठी झटणाऱ्या आरोग्यदूतांचा बदनापूरचे नगराध्यक्ष प्रदीप साबळे यांच्या कुटुंबियांनी सत्कार करून, ते देत असलेल्या सेवेबद्दल कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
बदनापूर येथे लॉकडाऊन काळातही सर्व शहराची साफसफाई स्वच्छता कर्मचारी करतात. घरोघरी फिरून घंटा गादीद्वारे कचरा जमा करतात. जीवाचा धोका असतानाही हे स्वच्छता कर्मचारी नागरिकांच्या आरोग्यासाठी झटत आहेत. या आरोग्यदूतांची सेवा बदनापूरचे नगराध्यक्ष प्रदीप साबळे आणि त्यांचे कुटुंबीय दररोज बघत होते. करत असलेल्या कामाबद्दल नगराध्यक्ष साबळे यांच्या आई कमलबाई साबळे आणि पत्नी आम्रपाली साबळे यांनी बदनापुर शहरामध्ये स्वच्छतेचे काम करत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱयांच्या शाल, श्रीफळ आणि छोटेसे बक्षीस देऊन गौरव करत त्यांचे आभार मानले.