बदनापूर (जालना) - तालुक्यातील वुंभारी शिवारातील एक तरुण गेल्या ५ दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह ३ जुलै रोजी सकाळी विहिरीत आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाजी बाबासाहेब पितळे (रा. डोंगरगाव सायगाव ता. बदनापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान शिवाजीचा घातपात केल्याचा आरोप नागरिकांनी करुन काही काळ मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. नंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
डोंगरगाव सायगाव येथील शिवाजी बाबासाहेब पितळे हा घरुन मागील पाच दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सगळीकडे शोध घेतला मात्र तो सापडला नाही. ३ जुलै रोजी वुंभारी शिवारातील भागवत बाबासाहेब बिडे यांच्या शेतातील पडीक विहीरीत मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह पाच दिवसांनी सापडल्याने घातपाताचा संशयदेखील वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह दोन तीन दिवसांपासून पाण्यात असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. या तरुणाचे लग्न झाले असून त्याच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा, पत्नी आणि आई असा परिवार आहे.