जालना - भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यात यशस्वी ठरलेला 'टेलीमेडीसीन आयसीयू' हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते आज (सोमवार) जालनामध्ये बोलत होते. त्यांनी या प्रयोगामुळे मृत्यूदर कमी होईल, अशी खात्री यावेळी व्यक्त केली.
राजेश टोपे म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी विशेष तज्ज्ञ मिळतीलच असे नाही. त्यामुळे भिवंडी आणि ठाणे येथे टेलीमेडीसीन आयसीयू ही सेवा राबविली होती आणि ती यशस्वीही झाली आहे. या सेवेच्या माध्यमातून दिल्ली आणि अन्य ठिकाणी असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित रुग्णाची तपासणी करणार आहेत. या उपक्रमाचे पहिल्या टप्प्यामध्ये गुरुवारी जालना, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, अकोला, या पाच जिल्ह्यांमध्ये उद्घाटन होणार आहे.
सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग राबविण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोलणे झाले असल्याचेही टोपे यांनी सांगितलं.
सद्यपरिस्थितीमध्ये कोविड-१९ ची लक्षणे दिसत असली तरी तब्येत ठणठणीत असेल, तर सात ते दहा दिवसानंतर संबंधित रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. तसेच अँटीजेन टेस्ट वाढवल्यामुळे आकडा देखील वाढलेला आहे. मात्र, मृत्यूदर कमी झाला आहे. त्यामुळे एकीकडे आकडा वाढत असताना दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही चांगले आहे आणि मृत्यूदर कमी करण्यात यश येत असल्याचे टोपे यांनी सांगितले.
कोविड-१९ आजारावर उपचार करण्यासाठी कोणालाही कोणतेही बिल देण्याची गरज नाही आणि अशा पद्धतीचे जर रुग्णालय बिल आकारत असेल तर या बिलाच्या पाचपट दंड त्या रुग्णालयाला लावण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही, आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा - सॅनिटायझर उद्योगामुळे मिळाला रोजगार, मात्र बनावट सॅनिटायझरचा धोका कायम
हेही वाचा - जालन्यात 107 वर्षाच्या आजीबाईंची कोरोनावर मात; कुटुंबातील 4 जणांसह सुखरुप पोहोचल्या घरी