जालना- भागातील जमुना नगरमध्ये रात्री दोन गटांमध्ये तलवारीने मारामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
झाडाखाली बसल्याच्या कारणावरून हाणामारी
जमुना नगरमध्ये माजी नगरसेवक अशोक पवार यांच्या घरासमोरून अरबाज बेग सुलतान बेग, वय 20 वर्ष हे जय नगर भागाकडे जात होते. याचवेळी कुलदीप अंबादास जगधने याने फिर्यादी अरबाज बेगला माझ्यासोबत किरकिर का केली? असे म्हणत तलवारीने हाणामारी केली .त्याच्यासोबत अक्षय विजय ढिलपे, शुभम राजू कांबळे, अजम मुक्तार शेख, सोन्या संतोष जाधव ,चंदू चंद्रकांत जाधव यांनी कुलदीप जगधने याला अरबाज बेगला मारण्यासाठी मदत केली. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
परस्पर विरोधी तक्रार
दुसऱ्या प्रकरणात विक्रम बालाजी जगधने वय 45 वर्ष जमुना नगर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास सय्यद उर्फ अरबाज बेग सुलतान बेग (वय 20 वर्ष) आणि त्याचे मित्र बसलेले होते. त्यांना यापूर्वी देखील इथे बसू नका म्हणून सांगितले होते. आज पुन्हा इथे बसू नका असे सांगितले असता त्यांनी शिवीगाळ करून लाठ्या काठयाने आणि तलवारीने माझ्यावर हल्ला केला. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या ज्योती बालाजी जगधने हीलादेखील या तरुणांनी मारहाण केली. याप्रकरणी अरबाज बेग याच्यासह बाबा बेग सुलतान बेग, राहणार जमुना नगर आणि प्रेम विनोद टाक वय 23, राहणार मंमादेवी मंदिर मस्तगड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान कदीम जालना पोलिसांनी या सर्व आरोपींना आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम .बी. टाक करत आहेत.