जालना- करोडो रुपयांची कामे करणार्या जालना नगरपालिकेने स्वतःच्याच अग्निशमन यंत्रणेच्या कार्यालयाला धोकादायक इमारत म्हणून सील लावले आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या यंत्रणेला कार्यालयाच्या बाहेर आपले कार्यालय थाटावे लागले आहे. आश्चर्य म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी यांच्यावर आहे. आणि आज हाच विभाग आपत्तीमध्ये सापडला आहे.
जुनी इमारत..
अग्निशमन कार्यालयासाठी निजाम कालीन एक जुनी इमारत आहे. ही इमारत देखील मोडकळीस आली आहे. भिंतीमधून पाण्याचे पाझर येत आहेत, आणि इमारती समोर असलेले लाकडाचे छत कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे ते देखील कधीही कोसळू शकते. अशा परिस्थितीमध्ये बाजूलाच अग्निशमन बंब उभा करण्यासाठी शेड बांधले आहे. आणि तिथेच एक छोटेसे कार्यालय आहे. या कार्यालयाची दुरावस्था झाली आहे. भिंतीला तडे गेले आहेत, एवढेच नव्हे तर एक कोपरा पडल्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी टेबलवर पडत आहे. इथे 24 तास कर्मचारी उपस्थित असतात. त्यामुळे रात्री-बेरात्री जर काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्नही हे कर्मचारी विचारत आहेत.
सील लावले..
इमारत मोडकळीस आलेली आहे, आणि दुर्घटना घडू शकते. म्हणून कर्मचार्यांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यांना तुर्तास बाजूच्या कार्यालयात स्थलांतरित केलेले आहे. मात्र तरीदेखील हे कर्मचारी इथेच बसत असल्यामुळे या कार्यालयाला सील लावण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली आहे. नवीन इमारतीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बंबच्या ठिकाणी कर्मचारी..
जालना नगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये एक अधिकारी 24 कर्मचारी आणि 5 बंब आहेत. सध्यपरिस्थितीत ज्या ठिकाणी हे बंब उभे असतात, त्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी कार्यालय थाटल्या मुळे हे सर्व बंब बाहेर मोकळ्या जागेत उभे आहेत. तसेच याच परिसरात या कर्मचार्यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे हे कार्यालय म्हणजे कर्मचाऱ्यांनी विरंगुळ्याचे ठिकाण केले आहे. विडी सिगारेट ओढणे, पत्ते खेळणे हे सर्व प्रकार येथे चालतात.
आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी..
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मागील महिन्यात जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला आणि त्यापैकी महत्त्वाची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या अग्निशमन दलाकडे महत्त्वाची साधने सोपविले आहेत. मात्र यंत्रणेने या साधनांची देखभाल-दुरुस्ती अजून सुरू केलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी जर आपत्तीला तोंड द्यावे लागले तर धूळखात पडलेली ही यंत्रणा स्वच्छ करण्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. इथे असलेल्या फायबर बोट चे इंजिन काढून ठेवले आहे. रबराच्या बोटचे गाठोडे सोडून त्याची तपासणीही केलेली नाही.