बदनापूर (जालना) - जिल्ह्यातील मंठा येथील नवविवाहीत तरुणीची एका माथेफिरुने भर बाजारात चाकूने वार करून हत्या केल्याची घटना ३० जूनला घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ व हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून विशेष वकील नेमण्याच्या मागणीसाठी बदनापूर येथे सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने कडकडीत बंद ठेवण्यात आला. यावेळी बदनापूर शहरातील व्यवावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळल्यामुळे शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद होत्या.
लग्नाला केवळ चारच दिवस झालेल्या मुलीचा भर बाजारात शेख अल्ताफ शे. बाबू या नराधमने खून केला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. शेख अल्ताफ हा तरुण या मुलीला मागील कित्येक दिवसांपासून त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून या मुलीचे शिक्षणही अर्धवट राहिलेले होते.
अशा प्रवृत्तीला खीळ बसावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात दाखल करून या खटल्यासाठी विशेष वकिलाची नेमणूक करावी, यासाठी येथील सर्व पक्ष, सामाजिक संघटना, हिंदू एकता मंचातर्फे बदनापूर शहरात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला बदनापूर येथील व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळून आपापली व्यावसिाकय प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. बदनापूर शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. यावेळी बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी या बंदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता.