जालना - अंबड तालुक्यात पाचोड चौफुलीवर आज पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता हा पुतळा बसविण्यात आला आहे. या घटनेवरुन शहरात तणाव निर्माण झाला आहे.
यादरम्यान, पोलिसांनी आमदार नारायण कुचे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या डोक्याला मारहाण झाल्याचे दिसत आहे. याप्रकरणावरुन शहरातील विविध संघटना वाजत-गाजत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येत आहेत. याप्रकरणी आमदार कुंचेसह ४४ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यासंबंधीची खात्री करण्यासाठी अंबड नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. अद्यापही मुख्याधिकारी पोलीस ठाण्यात आले नाहीत.
याप्रकरणी बोलताना आमदार कुचे म्हणाले, की अंबडमध्ये युवक पुतळा बसवित असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यामुळे मी तेथे गेलो होतो. मात्र, पोलिसांना वाटले त्यामध्ये मी सामील आहे. त्यामुळे पोलिसांनी मला अटक केली. मला मारहाण झाली नसून गाडी खरचटली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा अशी सर्वांचीच इच्छा होती असेही ते म्हणाले.
अंबड शहरामध्ये जालना - अंबड रस्त्यावर असलेल्या पाचोड फाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा प्रशासनाची परवानगी न घेता शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता उभारला. याप्रकरणी बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्यासह अन्य 44 जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण
अंबड रस्त्यावरील पाचोड फाट्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पुतळा उभारणीसाठी चौथरा तयार करून ठेवला होता. मात्र, तांत्रिक बाबींमध्ये या पुतळ्याची मान्यता अडकली होती. याबाबतची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव पाटील चाटे यांनी सांगितले. याप्रकरणी 44 जणांविरुद्ध भादवि कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सह कलम 11नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, चाटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत असताना काही लोक ट्रकमधून आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा क्रेनच्या साह्याने उभारत असल्याचे दिसले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलीस बळ कमी असल्यामुळे ते होऊ शकले नाही. त्यानंतर वरिष्ठांना कळवले आणि ते घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पुतळा बसवण्याचे काम पूर्ण झाले होते. ट्रक, क्रेन तसेच पुतळा बसविण्याचे साहित्यही उपस्थितांनी गायब केले होते. परंतू, त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार नारायण कुचे, देविदास कुचे, अंबादास अंभोरे, दिपकसिंह ठाकूर, बाबासाहेब इंगळे ,हनुमान धांडे, साजिदअली महमूदअली हाश्मी, मुरलीधर चौधरी, शेख फिरोज शेख अजीज, डॉक्टर राजेंद्र ठोसर, औदुंबर बागडे यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यांना पुतळ्याविषयी परवानगी मागितली असता, परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक माहिती घेण्यासाठी अंबड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. एकंदरीत या प्रकारामुळे अंबड शहरात शांतता असली तरी वातावरण तणावपूर्ण आहे. जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.