जालना - नवीन आणि जुना जालना अशा दोन भागांना जोडल्या जाणाऱ्या कुंडलिका नदीवरील लोखंडी पुलासंदर्भात अनेकांच्या आठवणी गुंतलेल्या आहेत. इंग्रजांनी सव्वाशे वर्षापूर्वी हा पूल बांधला होता. पूर्ण लोखंडामध्ये उभा असलेला हा पूल आजही हलक्या वाहनांसाठी मजबूत आहे. मात्र हा पूल मोडकळीस आल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधींनी हा पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी श्रेय संपादनासाठी भूमीपूजनही उरकून घेतले होते. सुमारे वर्षभरानंतर हा पूल पाडण्यास आज रविवारपासून सुरुवात झाली आहे.
इंग्रजांनी बांधलेल्या या पुलाच्या नोंदी आजही पाहायला मिळतात. इंग्रज लोक किती शिस्तप्रिय होते, याचे उदाहरण या पुलासंदर्भात देता येईल. या पुलाचे आयुष्य शंभर वर्षाचे होते. त्यामुळे शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर जालन्याच्या जिल्हाधिकार्यांना ब्रिटिश कंपनीकडून या पुलाचीची मुदत संपली असल्याचे पत्रही आले होते. त्यावेळेपासून या पुलावरील जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. दुहेरी मार्गाचा असलेला हा पूल सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी बांधण्यात आला होता. पंधरा दिवसावर पावसाळा येऊन ठेपला आहे आणि अशामध्ये हा पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. या पुलाच्या समांतरच आणखी एक छोटा पूल आहे.
या पुलावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे मात्र हा लोखंडी पूल बंद झाल्यामुळे आता येथून दुहेरी वाहतूक सुरू होईल. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या नदीला थोडा जरी पूर आला, तरी या लहान पुलावरुन पाणी वाहते. पर्यायाने हा पूल देखील पावसाळ्यात बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोखंडी पूल पाडण्याची ही चुकीची वेळ असल्याचे बोलले जात आहे. आता जरी हा पूल पाडला, तरी पावसाळ्यात नदीमध्ये पाणी असणार आहे. त्यावेळी पुलाची उभारणी शक्य होणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.