जालना - शहरापासून काही अंतरावर असलेल्या माळाचा गणपती परिसरात सुमारे पंधरा फूट लांबीच्या अजगराला पकडण्यात सर्पमित्राला यश मिळाले आहे. शेतीसाठी लागणाऱ्या हिरव्या जाळीमध्ये तो अडकून पडला होता. सर्पमित्र शेख फरीद यांनी सुरक्षितपणे त्याच्याभोवती अडकलेली ही जाळी कापून काढल्यानंतर त्याला पकडुन जंगलात सोडून दिले.
मंगळवारी दुपारच्या सुमारास जालना तालुक्यातील माळाचा गणपती परिसरातून सर्पमित्र शेख फरीद यांना एका व्यक्तीचा फोन आला. त्यांनी परिसरात साप दिसल्याचे सांगितले. त्यावेळी शेख फरीद यांनी त्या परिसरातील शिवारात जाऊन पाहणी केली असता भला मोठा अजगर शेतीसाठी लागणाऱ्या हिरव्या जाळीमध्ये अडकून पडल्याचे आढळून आले. शेख फरीद यांनी त्याच्याभोवती अडकलेली ही जाळी कापून काढली आणि सुरक्षितपणे त्याला पकडून वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधत बुधवारी जंगलात सोडून दिले.
या अजगराबद्दल माहिती देताना शेख फरीद म्हणाले, हा भारतातील बिनविषारी साप प्रकारातील अजगर आहे. उंदीर, हरीण अशा प्राण्यांची शिकार करण्यात हे अजगर पटाईत असतात आणि एकदा शिकार केल्यानंतर दोन ते तीन महिने एकाच जागेवर पडून राहतात. सध्य परिस्थितीत बिळाच्या बाहेर येणाऱ्या सापांचे प्रमाण वाढले आहे. या अजगराप्रमाणेच मंगळवारी धीवर जातीचे दोन आणि धामण जातीच्या एका सापाला पकडण्यात आले.
सर्पमित्र म्हणून शेख फरीद हे गेल्या अनेक दिवसापासुन साप पकडण्याचे काम करतात. त्यांच्या वडिलाकडुन यासबंधीचे प्रशिक्षण घेतले आहे. सध्या शेख फरीद यांच्यासोबत प्रकाश चौधरी, नदीम चौधरी, गोपाल कुरील हे सर्पमित्र म्हणून काम करत आहेत. अशाप्रकारे साप आढळल्यास नागरिकांनी त्यांना मारू नये व त्यांना सर्पमित्रांना कळवावे असे आवाहनही केले आहे.
दरम्यान, सर्पमित्र शेख फरीद यांनी अजगराला पोत्यातून बाहेर काढल्यानंतर यांच्या वडिलांना चावा घेण्याचा प्रयत्न केला. जरी हा अजगर चावला असता तरी तो बिनविषारी असल्यामुळे याचा जास्त परिणाम झाला नसता असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे अजगर विविध प्राण्यांना खात असल्यामुळे त्यांच्या शरीरात थोडेफार का होईना मानवाच्या शरीराला हानिकारक असणारे घटक असल्यामुळे मानवावर याचा थोडाफार तरी परिणाम होतो अशी माहितीही त्यांनी दिली.