जालना - औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मिळून लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. एकूण १८ लाख लाख ४३ हजार १३१ उमेदवार खासदारकीसाठी मतदान करणार असून यामध्ये ६ तृतीयपंथीयांचाही समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय
जालना लोकसभा मतदारसंघ विचित्र अवस्थेमध्ये विभागणी केलेला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडले गेले आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, पैठण, हे ३ मतदारसंघ लोकसभेसाठी जालना जिल्ह्याला जोडले गेले आहेत. त्यामुळे जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील हा प्रचंड मोठा असलेला मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. त्यातच जिल्ह्याची हद्द नसल्यामुळे राजकीय कामाशिवाय इतर कुठलाही संपर्क औरंगाबाद जिल्ह्यातील जनतेशी येत नाही. म्हणून जिल्ह्याचा खासदार कोण आहे ? हे देखील त्यांना माहित नसते. अशा परिस्थितीमध्ये जालना आणि औरंगाबादमधील ९ लाख ७७ हजार ४९ पुरुष ८ लाख ६५ हजार ३७६ महिला आणि ६ तृतीयपंथी असे एकूण १८ लाख ४३ हजार १३१ उमेदवार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अन्य पक्षाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. तसेच गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले अर्जुन खोतकर यांनीदेखील अजून लोकसभेतून माघार घेतली नसल्याचे कालच स्पष्ट केले आहे. त्यामुळे जोपर्यंत शिवसेना-भाजप युतीचा हा तिढा सुटत नाही, तोपर्यंत अन्य पक्षांचे उमेदवार घोषित होणे अवघड आहे.