जालना - विविध मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था आणि चिटफंडच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या अनेक संस्थांची चौकशी सुरू आहे. ज्या संस्थांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, अशा संस्थेच्या संचालकांचा ही तपास सुरू आहे. मात्र, पोलीस प्रशासनाच्यावतीने हा तपास संथगतीने होत असल्यामुळे तपास लवकर व्हावा यासाठी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या तपासाने आता वेग घेतला असून कळंब (जि. उस्मानाबाद) येथील शुभ कल्याण मल्टीस्टेटमध्ये आणि नाशिक येथील मैत्रेय चीटफंड या संस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित होत आहे.
जालना शहरात सन 2017 मध्ये कळंब येथील शुभ कल्याण मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी लिमिटेड, दिलीप नगर, हावरगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या संस्थेच्या अनेक शाखा बंद झाल्या होत्या. त्यानंतर गुंतवणूकदारांनी संस्थेविरोधात फसवणुकीची तक्रार दिली होती. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित असलेल्या भास्कर बजरंग शिंदे, नागिनीबाई बजरंग शिंदे, कमलाबाई बाबासाहेब नखाते, चत्रभुज आसाराम तळेकर (सर्व रा. कळंब, जि. उस्मानाबाद), अजय दिलीप आपेट, विजय दिलीप आपेट, शालिनी दिलीपराव आपेट, अभिजीत दिलीप आपेट (सर्व रा. परळी, जि. बीड, प्रतिक्षा आप्पासाहेब आंधळे, आशा रामराव बिराजदार (दोघे रा. लातूर), बापुराव सोनबा कांबळे (रा. कंधार), शिक्षक गरड आणि वाघमोडे या 13 जणांचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - जालन्यात सापडले 7 वे पिस्तूल; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त
वरील 13 जणांपैकी कोणाच्याही मालमत्तेची, राहणाऱ्या ठिकाणाची माहिती कोणाला असल्यास जालना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा तसेच ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे त्यांनी गुंतवणूक केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच नाशिक येथील मैत्रेय चिटफंड संस्थेच्या गुंतवणूकदारांनी देखील पुढे येऊन गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - महिला पोलीस उपनिरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याप्रकणी गुन्हा दाखल