जालना - कोरोना पार्श्वभूमीवर विविध भागात अडकून पडलेल्या नागरिकांनी पायी घरची वाट धरली होती. मात्र, प्रशासनाने व स्वयंसेवी संघटनांनी जिल्ह्यातील पुढच्या चेक पोस्टपर्यंत बसेस उपलब्ध करून दिल्याने पायी निघालेल्या मजुरांना दिलासा मिळाला. असे असले तरी पायी जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढत असल्याने सोमवारी सकाळी ७ पासून चेक पोस्टवर थांबलेल्या ७० मजुरांना सोडण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण यांनी दोन बसेस उपलब्ध करून दिल्या. तसेच परिवहन मंडळाच्या बसने परराज्यातील २१ प्रवाशांना थेट गोंदियापर्यंत पाठविण्यात आले असून या बसमधील मजुरांना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नाश्ता व पाणी वाटप करून हिरवा झेंडा दाखवला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे विविध जिल्ह्यांमध्ये परप्रांतीय मजूर, कामगार अडकून पडले. तर, लॉकडाऊन वाढत गेल्याने मुंबई, पुणे, नाशिक आदी भागात कामधंद्यासाठी गेलेले मजूर वाहने उपलब्ध नसल्यामुळे डोक्यावर ओझे घेऊन तापत्या उन्हात लहान मुलांसह गावाकडे पायी निघालेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद-जालना महामार्ग रस्त्यावर पायी जाणाऱ्या जथ्थ्यांची संख्या दिसू लागली. तर, अनेक मजूर थकूनभागून झाडाखाली बसलेले चित्र दिसत आहे. अशा कठीण परिस्थितीत युवासेना प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी वाटसरूंना नाश्ता व पाण्याची जागोजागी व्यवस्था केली.
रस्त्यावरून पायी जाणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनदेखील हैराण झाले आहे. शासनाने या परराज्यातील मजुरांना गावी सोडण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेस ११ मे पासून सुरू केल्या आहेत. ११ मे रोजी बदनापूर चेक पोस्टवरून थेट २१ प्रवाशांना घेऊन बस पाठविण्यात आली आहे. या बसमध्ये बसलेल्या मजुरांना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नाश्ता व पाण्याची व्यवस्था केली. यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, जयप्रकाश चव्हाण, कैलास चव्हाण आदी उपस्थित होते.
बदनापूर वरुडी चेक पोस्टवर नायब तहसीलदार संजय शिंदे, आरटीओ विभागाचे झाडबुके एसएम, शरद तरटे, अच्युत भातलवंडे, प्रवीण केदारे हे अधिकारी, कर्मचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायी येणाऱ्या मजुरांची यादी करून त्यांना वाहने उपलब्ध करून बैठक व्यवस्था करत आहेत.