जालना - शिवसेनेच्या वतीने दुष्काळ पिडीत चारा छावण्यांतील शेतकऱ्यांना "बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजने"अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. जालना तालुक्यातील घारे मानेगाव येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडले, जालना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर आदि उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना चारा छावणीमध्ये आणावे लागले, यंदा दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे, याची झळ फक्त जनावरांनाच नाही तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि जपणाऱ्या शेतकरी बांधवांना देखील बसत आहे, जनावरांसोबत त्यांनाही चारा छावणीमध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील काळजी घेतली पाहिजे. या हेतूने बाळासाहेब ठाकरे प्रसाद योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा प्रयत्न आहे. खरेतर ही मदत नसून माझे कर्तव्य आहे. ते पार पाडण्याचा प्रयत्न आहे, सध्या अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत, हे देखील लक्षात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व बँकांना शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासंदर्भात आणि त्यांना मदत करण्यासंदर्भात आदेशित केले आहे. त्याविषयी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या-त्यांच्या कार्यक्षेत्रातील बँकांना सरळ करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने या बँकांना सरळ केले जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
आठवडाभर पुरेल इतकेच शिधा साहित्य
शिवसेनेकडून देण्यात आलेल्या शिधा साहित्यामध्ये गहू आटा, साखर, मिरची पावडर, गोडे तेल, पोहे इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. मात्र, हे साहित्य एका कुटुंबाला जेमतेम आठवडाभर पुरेल इतकेच आहे. येथील लोकांच्या गरजेपेक्षा ते खूपच कमी असले तरी किमान काही मदत मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
तसेच रजाकाराला हाकलून लावण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना कठोर भूमिका घ्यावी लागली. ते आपल्या जनतेच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे त्यांना पोलादी पुरुष असेही म्हणतात. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी कणखर भूमिका घेऊन मराठवाड्यातील या दुष्काळग्रस्त जनतेच्या पाठीशी उभे राहावे आणि पोलादी पुरुष हावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.