जालना - आम्ही असे रस्ते तयार केले ज्यावर २०० वर्ष खड्डे पडणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी ते आज जालना येथे आले होते. दरम्यान जनसभेला संबोधित करताना मागील ५ वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामांचा त्यांनी पाढा वाचला.
लोकसभा निवडणूकांचा दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया आटोपली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. जालना लोकसभा मतदार संघासाठी तिसऱ्याच टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी जालना लोकसभा मतदार संघातील पैठण येथे आले होते.
हे रस्ते असे बनवले आहे की तुम्ही सर्व जिवंत आहेत तोपर्यंत. तुमची मुलं बाळं जिवंत आहेत तोपर्यंत आणि तुमचे नातू-पणतू जिवंत असतील तोपर्यंत. म्हणजे २०० वर्षे या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. असे उत्तम दर्जाचे रस्ते आपण बांधले आहेत, असा दावा केंद्रीय रस्ते महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केला.
गडकरी यांनी पंतप्रधान मोदींचीही भरभरून स्तुती केली. आतंकवाद्यांसमोर गुडघे टेकणारा मजबूर पंतप्रधान तुम्हाला हवाय की त्यांना साडेतोड उत्तर देणारा हवा? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थितांना विचारला. आम्ही गंगा स्वच्छ केलीच नसती तर प्रियांका गांधी यांना गंगेचे पाणी प्यायला मिळालेच नसते. पाण्यावरील वाहतुकीची व्यवस्था केली म्हणून त्यांना गंगा यात्रा करता आली, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला मारला.
गडकरींनी भाजपच्या कामांचा पाढाही वाचला. आपण अनेक योजना लागू केल्या आहेत. उज्वला योजना असो की आरोग्यदायी योजना, आपण जात पाहून या योजनेचा लाभ दिला नाही. तर मतदान करताना तुम्ही जात का पाहता, असा प्रश्न त्यांनी जनतेला यावेळी विचारला.
यावेळी त्यांनी भविष्यात आपण काय करणार हेही जनतेला सांगितले. पश्चिम घाटातून वाहणारे पाणी आपण नद्यांमध्ये आणणार आहोत. ही योजना ४० हजार कोटींची असून ते पाणी जायकवाडी धरणाला देण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी हमी त्यांनी यावेळी दिली. मराठवाड्यासह देशातील पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय आपण राहणार नाही, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली. काँग्रेस नेहमी गरिबी हटाओचा नारा देत आली आहे. पुन्हा ते भूलथापा मारत आहेत. मागच्या ७० वर्षात गरिबी हटली नाही. गरिबी हटली ती त्यांच्या चेल्या चपाट्यांची, असा टोलाही त्यांनी काँग्रेसवर मारला. आपल्या काळात एकही भ्रष्टाचार आपण होऊ दिला नाही, असेही ते म्हणाले.