जालना - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदीबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे अत्यावश्यक घटकात असलेल्या नागरिकांना अधिकृत पास असेल, तरच पेट्रोल द्यावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. मात्र तरीही शहराबाहेरील काही पेट्रोल पंपावर बॉटलमध्ये पेट्रोल देण्यात येत होते. याप्रकरणी पेट्रोल पंपमालकासह कामगार आणि दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरोजलाला तांबोळी असे त्या पंपचालकाचे, तर कामगार शेख शाहरुख आणि दुचाकीस्वार करण विलास निकाळजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांचे पथक शनिवारी रात्री गस्तीवर होते. यावेळी त्यांना राजूर रोडवरील गुंडेवाडी शिवारातील तांबोळी पेट्रोलपंपावर अवैधरित्या एका दुचाकीस्वारास बॉटलमध्ये पेट्रोल देताना रंगेहात आढळून आले होते. यावेळी पथकातील प्रदीप घोडके यांच्या तक्रारीवरुन पंपमालक फेरोजलाला तांबोळी (रा. जालना), नोकर शेख शाहरुख शेख शाबाख (राळा हिवरा) आणि दुचाकीस्वार करण विलास निकाळजे (रा. तांदुळवाडी) या तीन जणांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात भादंवि. कलम १८८, १०९, २६९, २७० आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या ५१ (बी) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.