जालना: आमच्या मुळेच शिवसेनेत फूट पडली असे म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आत्मपरीक्षण केल्यानंतर त्यांना त्यांची चूक कळाली असेल, त्यामुळेच त्यांनी स्वतःच कबुली दिली, अशी खोचक टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली आहे. आज राज्यस्तरीय अर्थ परिषदेच्या उदघाटनासाठी रावसाहेब दानवे हे जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले रावसाहेब दानवे: दानवे पुढे म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी समर्थपणे पार पाडली नाही. मातोश्री बाहेर शिवसैनिकांना दोन-दोन दिवस भेटीची प्रतीक्षा करावी लागली. तसेच अडीच वर्षे कोणत्याही शिवसैनिकांचे काम झाले नाही. याचाच त्यांना आता पश्चाताप होत असेल. मिटकरी यांनी राज्यात नवी समीकरणे उदयास येणार आहेत असे वक्तव्य केले. यांवर बोलतांना केंद्रीयमंत्री दानवे म्हणाले की, राज्याच्या राजकारणात पुढच्या काळात काय घडामोडी होतील याचा अंदाज ना पवार साहेबाना आहे ना कोण्या राजकीय नेत्यांला आहे. परंतु आमच्या बाजूने आता यापुढे नवीन समीकरण घडवले जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांचाही चांगलाच समाचार घेतला. गेले अडीच वर्षे ते कोणाला दिसले नाहीत या निमित्ताने त्यांना बोलायला मिळत आहे, असे दानवे यावेळी म्हणाले