जालना - तुरीच्या प्रश्नावरून खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साले' म्हटल्याने वादंग उठले होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांना पाडण्याचा चंगच बांधला होता. जालना जिल्ह्यापुरतेच नाही, तर शेजारच्या बुलढाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यातूनही विरोधक दानवे मात देण्यासाठी कामाला लागले होते. मात्र, जिल्ह्यात 'चकवा' म्हणून ओळखले जाणाऱ्या दानवेंनी यावेळीही विरोधकांना चकवा देऊन सत्ता कायम राखली. तब्बल पाचव्यांदा विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरवत दानवे लोकसभेत पोहोचले आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघातून ३ लाख ३३ हजार ३८१ मते मिळून खासदार दानवे यांनी आपली विजयाची घोडदौड सुरू ठेवली. खासदार दानवे यांची ही खासदार होण्याची पाचवी वेळ आहे. यापूर्वी १९९९, २००४, २००९, आणि २०१४ अशा सलग चारही लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत. मात्र, राजकारणात दांडगा अनुभव असलेल्या खासदारांना या वेळची लोकसभा जड जाईल असे चित्र होते. त्यांच्यामध्ये आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांच्यात सहा महिन्यापूर्वी उडालेल्या खटक्यावरून तसे वाटत होते. त्यात विदर्भातील बच्चू कडू यांनी येऊन तेल घालून हे प्रकरण पेटत ठेवले. मात्र, शेवटी अर्जुन खोतकर यांच्यासोबत झालेल्या मनोमिलनामुळे रावसाहेब दानवे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.
१९९९ ते २००९ दरम्यान ३ वेळा निवडून आलेल्या खासदार दानवे यांनी जालना जिल्ह्याचा विकास केला नसल्याच्या बोभाटा सर्वत्र उठला होता. कदाचित त्यामुळे २०१४ मध्येच त्यांचा पराभवही होऊ शकला असता. मात्र, मोदी लाटेने खासदारांना तारून नेले आणि चौथा विजय मिळविला. यावेळच्या कारकिर्दीतही दानवे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले होते. त्यामुळे त्यांनी जनतेच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना या सर्व गोष्टींचा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, जनतेने पुन्हा एकदा दानवेंच्या बाजूने कौल दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा ३ लाख ३२ हजार ८१५ मतांनी पराभव केला.