जालना - महाराष्ट्रात कोरोनाच्या AY4 व्हेरीयंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत जलद गतीने लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, की लसीकरण जलदगतीने करण्यासाठी दोन डोसमधील 84 दिवसांचा अंतर कमी करणार नाही. केंद्राचा तसा मानस नाही. महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कोरोनाच्या AY4 व्हेरीयंटचा शिरकाव झाला नाही. हा शिरकाव महाराष्ट्रात होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाला योग्य सूचना केल्या जातील अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.
हेही वाचा-ऐन दिवाळीच्या तोंडावर लाल परीच्या टिकीटात दरवाढ; सर्वसामान्याचा खिशाला लागणार कात्री!
लसीकरण वेगाने होण्यासाठी आणखी काही विभागांची मदत
केंद्राच्या टास्क फोर्सने जलदगतीने लसीकरण करण्याच्या सूचना राज्यांना केल्याची माहिती समोर आली आहे. मिशन कवचकुंडल अंतर्गत महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत वेगाने लसीकरण केले जाणार असल्याचेदेखील ते म्हणाले. लसीकरण वेगाने होण्यासाठी आणखी काही विभागांची मदत घेतली जात आहे. सध्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांचे आहे. या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा केंद्राचा मानस नाही. त्यामुळे हे अंतर तसेच राहणार आहे. दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दोन ते तीन दिवसात अर्थ विभागाकडे पाठपुरावा करून प्रयत्न करणार असल्याची माहितीदेखील आरोग्य मंत्री टोपे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा- किरण गोसावीने शरण येण्यासाठी संपर्क साधला नाही - पुणे पोलीस
कोरोनाची तिसरी लाट निष्प्रभ
कोरेनाची तिसरी लाट येईल, अशा पद्धतीची शक्यता होती. मात्र, नवरात्रोत्सवानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनाची तिसरी लाट निष्प्रभ ठरत असल्याचे दिसून येत असल्याचा दावाही आरोग्य मंत्र्यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला आहे.