जालना : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातात वाढ झाली आहे. नुकताच ओडिसात देखील भयंकर अपघात झाला होता. जुलैमध्ये मात्र जालन्यात मोठा रेल्वे अपघात होता होता थोडक्यात टळला. जालना- नांदेड रेल्वेमार्गावर असलेल्या सातोना-उस्मानपूर रेल्वे स्थानकादरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं लोखंडी ड्रम रेल्वे ट्रॅकवर ठेवला होता. 'देवगिरी एक्सप्रेस' येत असताना रेल्वे चालकाला काही अंतरावरून समोर रेल्वे रुळावर काहीतरी वस्तू असल्याचं निदर्शनास आलं. रेल्वेमार्ग चॅनल क्रमांक 234 ते 235 मध्ये चालकानं 'एमर्जन्सी ब्रेक' लावून रेल्वेचा वेग कमी केला. पण रेल्वे ड्रमला धडकली. त्यामुळे ड्रम अक्षरशः हवेत उडून बाजूला जाऊन पडला होता.
रेल्वे चालकाचं प्रसंगावधान : रेल्वे चालकानं खाली उतरुन पाहणी केली. तेव्हा त्याला ड्रमच्या बाजूला एक लोखंडी पोल रेल्वे रुळाच्या बाजूला पडलेला असल्याचं आढळलं. याविषयी तपास केला असता सातोना परिसरातील बाळू मखमले नावाच्या व्यक्तीनं रेल्वे रुळावर दगडानं भरलेला ड्रम ठेवलेला असल्याचं निष्पन्न झालं. ही घटना 5 जुलैच्या रात्री घडली होती. रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळं होणारा मोठा अपघात टळला होता.
रेल्वे रुळावर लोखंडी ड्रम : दरम्यान रेल्वे पोलिसांनी पकडून त्याला न्यायालयात हजर केलं, तेव्हा त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. रेल्वे रुळावर ठेवलेल्या या लोखंडी ड्रममध्ये पत्रे भरलेले होते. यावेळी 15 मिनिटं रेल्वे घटनास्थळी थांबली होती. याविषयी चौकशी केली असता, या मार्गावर रेल्वे विद्युतीकरणाचं काम चालू आहे. त्यामुळे फाऊंडेशन बनवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी लागणारं साहित्य रेल्वे रुळाच्या आसपास पडलेलं असल्याचं दिसून आलं.
देवगिरी एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला : यावेळी चालकाच्या सतर्कतेमुळं देवगिरी एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला होता. यासंबंधी सहाय्यक उपनिरीक्षक परतूर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करुन तपास हाती घेतला होता. संबंधित ड्रम जप्त करण्यात आला होता. ही कामगिरी वारिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जालना आरपीएफचे उपनिरिक्षक संदीप कुमार, हवालदार सुनिल नलावडे, काँन्स्टेबल गणेश काळे यांनी केलीय.
हेही वाचा :