जालना - गोदावरी शिक्षण संस्था संचलित कुचरवटा भागात असलेल्या अकरम फातेमा माध्यमिक कन्या शाळेची मान्यता रद्द करावी, असा प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविला आहे.
कन्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव गोदावरी शिक्षण संस्था संचलित शाळा जालन्यासह अन्य ठिकाणी सुरू आहेत. या संस्थेच्या जुन्या जालन्यातील कुचरवटा भागातील आकरम फातेमा माध्यमिक कन्या शाळेत अनियमितता आढळून आली होती. त्यानुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या, बालकांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांच्या बाबतीत संस्था गांभीर्याने घेत नव्हती. त्यामुळे या शाळेची अनेक वेळा तपासणी झाली होती. या तपासणीमध्ये शाळेमध्ये क्रीडांगण नसणे, स्वयंपाकगृह नसणे, विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असणे, वाचनालय नसणे, अशा अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती नियुक्तही केली होती. या समितीने आपला अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकार्यांकडे दिल्यानंतर या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती. त्याचेही उत्तर आले नाही. तसेच स्मरण पत्र देऊन या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. परंतु एक महिन्याच्या मुदतीमध्ये संस्थेकडून कोणताही खुलासा आला नाही. याचा अर्थ संस्थेला चौकशी मध्ये आढळून आलेल्या सर्व त्रुटी मान्य असल्याचे ग्राह्य धरून प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव दिनांक 24 मार्च रोजी शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांच्याकडे पाठविला आहे.
काय होऊ शकते पुढे शाळेबद्दलच्या तक्रारी लक्षात घेता शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी या शाळेची मान्यता रद्द केली.शाळा बंद न पडता जालना जिल्हा परिषदेच्या वतीने प्रशासक नियुक्त करून सुरूच ठेवली जाईल.जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.चौकशी अहवालातील त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत संस्थाचालकांचा यामध्ये हस्तक्षेप असणार नाही. येत्या शैक्षणिक वर्षात या शाळेची परिस्थिती कशी असेल? हे सर्व भवितव्य औरंगाबाद शिक्षण उपसंचालकांनी घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असेल.