जालना - जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हवालदार पदावर कार्यरत असलेले सिद्धार्थ वाघमारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. हे पदक मिळवणारे वाघमारे हे जालना जिल्हा कारागृहातील तिसरे कर्मचारी आहेत. कारागृह प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिद्धार्थ वाघमारे यांना हे पदक जाहीर झाले आहे.
पदक जाहीर झाल्याबद्दल कारागृह अधीक्षक श्रीमती अरुणा मुगुटवार यांच्या हस्ते वाघमारे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कारागृहातील तुरुंग अधिकारी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची देखील उपस्थिती होती.
हेही वाचा - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 7 वर्षे पूर्ण...मात्र अद्याप तपास यंत्रणेला अपयशच
पुरस्कार संदर्भात माहिती देताना कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटवार म्हणाल्या की, कारागृहातून राष्ट्रपती पदक पुरस्कारासाठी सहा जणांचे प्रस्ताव पाठवले होते. त्यापैकी वाघमारे यांची निवड झाली आहे. कारागृह सुरू झाल्यापासून आतापर्यंत तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळाले असल्यामुळे आपल्याला याचा अभिमान आहे. यापुढेही या कर्मचाऱ्यांनी असे पदक मिळवण्यासाठी चांगले काम करावे, समाज, संस्थेकरिता समर्पित भावनेने काम केले, तर स्वतःला मिळणारे समाधान हे पुरस्कारापेक्षाही मोठे असते, असे मुगुटवार म्हणाल्या.
कामाचे मूल्यमापन हे आपल्या गरजांमधून व्यक्त होते. त्यामुळे आपल्या गरजा जर मर्यादित ठेवल्या तर आपण पण चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. चुकीच्या मार्गाने जाण्याची गरज पडत नाही. कर्मचाऱ्यांनी घड्याळ्याच्या काट्याकडे पाहून काम न करता हातातील काम पूर्ण कसे होईल, यावर जास्त भर दिला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. सत्काराबद्दल बोलताना सिद्धार्थ वाघमारे यांनी गेल्या 28 वर्षांच्या नोकरीमधील अनुभव सांगितले. तसेच त्यांना मिळालेला पुरस्कार सर्व कर्मचाऱ्यांना समर्पित केला आहे.