जालना - मृग नक्षत्र सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरीदेखील अद्याप पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. भयाण परिस्थितीला सामोरे जावे लागू नये आणि पाऊस पडण्यास सुरुवात व्हावी, यासाठी जालन्यातील भाविकांनी सलग 36 तास गणपतीला जलाभिषेक करून अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
जुना जालन्यातील पाठक मंगल कार्यालयात आज (शनिवार दि. 22) पासून सकाळी सात वाजता अथर्वशीर्ष पठनाला सुरुवात झाली. उद्या सायंकाळी सात वाजेपर्यंत अखंड जलाभिषेक आणि अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम येथे सुरू राहणार आहे. शहरातील नामवंत पुरोहित तसेच भाविक आपली सेवा येथे समर्पित करणार आहेत. दर एक तासाला एक दाम्पत्य अशा पद्धतीने गणपतीला जलाभिषेक सुरू आहे. उद्या सायंकाळी साडेसात वाजता महाआरती होऊन या उपक्रमाचा समारोप होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित कुलकर्णी, सचिन देशपांडे, अमित कुलकर्णी, अनंत वाघमारे, गजानन देशमुख आधी तरुण पुढाकार घेत आहेत.