जालना - कोरोनाने राज्यात हाहाकार उडाला असताना बनावट सॅनिटायझरचा शहरात साठा आढळून आला आहे. व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हस्तीमल जैन यांची मालकी असलेल्या कल्पना एम्पोरियममध्ये जिल्हा प्रशासनाने छापा मारला. या कारवाईतून सहा लाखांचे बनावट सॅनिटायझर आणि मास्क जप्त करण्यात आले. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने शहरांमध्ये बनावट सॅनिटायझरचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसय्ये यांना सिंधी बाजार येथील भुवनेश्वरी फॅन्सी या दुकानातून बनावट सॅनिटायझर विकले जात असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी दोनशे रुपयांची नोट देऊन एक बनावट ग्राहक दुकानात पाठविला. सोबतच आणखी दोन पंचही पाठवले.
यावेळी दुकानदाराला विश्वासात घेतले असता बनावट सॅनिटायझर जुन्या मोंढा येथील कल्पना एम्पोरियम या दुकानातून घेतले असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर जिल्हा पुरवठा विभाग, स्थानिक गुन्हे शाखा, अन्न व औषधी प्रशासन, महसूल विभाग या विभागांनी एकत्र येत कल्पना एम्पोरियम या तीन मजली दुकानांमध्ये सायंकाळी धाड टाकली.
हेही वाचा-कोरोनाचे ३ नवीन रुग्ण, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात
सुरुवातीला या दुकानाचे मालक आनंद हस्तीमल जैन (बंब ) यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिस प्रशासनाने या सर्व उत्तरांची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिथे दडवून ठेवलेला मालही पहायला मिळाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या दुकानाची झाडाझडती सुरू होती. यावेळी १८ हजार ९०० मास्क आढळून आले. प्रत्येकी २५ रुपये किंमत असलेल्या या मास्कची एकूण सुमारे चार लाख ७५ हजार रुपये किंमत आहे. यासोबत अन्य साहित्य असा एकूण सहा लाख ४ हजार ७१३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा-VIDEO: भारत 'स्टेज-२' च्या उंबरठ्यावर..जाणून घ्या काय आहेत 'कोरोना स्टेजेस'
याप्रकरणी पुरवठा अधिकारी बसय्ये यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुवनेश्वरी फॅन्सी या दुकानाचे मालक, कल्पना एम्पोरियमच्या मालकाविरोधात जीवनावश्यक वस्तूंचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सिंधी बाजार येथे राहणारे आकाश भुपेंद्रसिंग राजपुरोहित, भूपेंद्रसिंग राजपुरोहित त्यांच्या दुकानातील कामगार गणेश भिमराव सातपुते, कल्पना एम्पोरियमचे मालक आनंद हस्तीमल जैन आणि मुंबई येथील भिवंडीत राहणारे सिंघवी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान चार जणांना अटक करण्यात आली आहे. सिंघवी यांला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
हेही वाचा-VIDEO : 'कोरोना' उद्रेक, अन् चीनमधील अनुभव.. विशेष मुलाखत - भाग ३
आरोपी असलेल्या आनंद हस्तीमल जैन (बंब) याचे वडील हस्तीमल जैन हेच सर्व कारभार पाहतात. हस्तीमल जैन यांच्याकडे सध्या अनेक मोठी राजकीय पदे आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अशी पदे आहेत. तसेच त्यांच्याकडे भारतीय जैन संस्था अध्यक्ष, ग्रामीण व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष, जनरल मर्चंट असोसिएशन जालनाचे अध्यक्ष अशी अनेक पदे आहेत. त्यामुळे कदाचित त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने ही धाडसी कारवाई केली आहे.