जालना - हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून जिल्हा विशेष शाखेतील पोलीस नाईक प्रतापसिंग इंदलसिंग सुंदरडे (वय 36) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील मातोश्री लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या श्रीनगर येथे गुरुवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. आकाश बालाजी शहाणे, बालाजी मधुकर शहाणे, विकास बालाजी शहाणे, असे हल्ला केलेल्या आरोपींची नावे आहेत. या हल्ल्यामध्ये सुंदरडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - रुग्णाच्या नातेवाईकांचा घाटी रुग्णालयात राडा; 30 ते 40 जणांनी केली तोडफोड
प्रताप सुंदरडे यांनी आकाश बालाजी शहाणे याला काही दिवसांपूर्वी हात उसने पैसे दिले होते. हे पैसे परत मागण्यासाठी सुंदरडे हे गुरुवारी रात्री शहाणे याच्या घरी गेले होते. तेव्हा पैसे मागण्यासाठी घरी का आला? म्हणून आकाश बालाजी शहाणे, विकास शहाणे यांनी सुंदरडे यांना शिवीगाळ करून फावड्याच्या दांड्याने, कुऱ्हाडीने आणि विटा फेकून मारत बेदम मारहाण केली. या हल्ल्यामध्ये कुऱ्हाडीचे घाव डोक्यावर आणि विटा फेकून मारल्याने पाठीला आणि पायाला लागल्याने सुंदरडे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
हेही वाचा - मुंबईतील ५ बोगस डॉक्टरांना अटक, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रावर चालवत होते रुग्णालय
हल्लेखोरांनी त्यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळीही तोडून घेतली. गंभीर जखमी झालेल्या सुंदरडे यांच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यात आरोपी आकाश शहाणे, बालाजी शहाणे, विकास शहाणे या तीन जणांविरुध्द भादंवि 324, 323, 327, 336, 504, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जोगदंड करीत आहेत.