बदनापूर (जालना) - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आणि शनिवारीआरोग्य विभागाच्या सरकारी वाहनात रोकड व दारू सापडल्यामुळे वरुडी चेक पोस्टवर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. पोलीस दल सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. जालना औरंगाबाद महामार्गावर वरुडी येथे चेकपोस्ट आहे. दोन्ही जिल्ह्याचे पोलीस या ठिकाणी वाहने तपासणी करून सोडतात. शनिवारी येथील चेकपोस्टवर आरोग्य विभागाच्या शासकीय वाहनातून रोकड व दारू जालना पोलिसांनी जप्त केली होती.
गृहमंत्री अनिल देशमुख हे जालना दौऱ्यावर आलेले असल्यामुळे वाहन तपासणी करण्यात येत होती. जालना जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्यक वाहनाला संचारबंदीतून प्रवास करण्याची सूट दिली आहे का हे तपासले जात होते. तसेच वाहनाची ही कसून तपासणी होत होती. या ठिकाणी जालना पोलिसांच्या पथकाचे प्रमुख शिवसिंग बहुरे यांच्यासह मनोज निकम, आदमाने, गुसिंगे, कामकर हे तपासणी करत होते. गृहमंत्री येणार या पार्श्वभूमीवर जालना पोलीस अधीक्षक पी. चैतन्य, बदनापूरचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर आदिनी सकाळी या चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केलेली होती.