जालना - पुणे जिल्ह्यातुन महागड्या मोटारसायकली व मोबाईल चोरणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोन आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेने त्यांच्याकडून 5 मोटारसायकल व 4 मोबाईल असा एकूण 8लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महागड्या गाड्या विक्री करण्यासाठी गिऱ्हाईकांचा शोध - जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहीती घेऊन गुन्हे उघड करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार जालना शहर हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहीती घेत असताना गुप्त माहिती मिळाली की, संदेश पाटोळे याने त्याच्या साथीदारासह अनेक महागड्या गाड्या चोरल्या असुन तो त्या गाड्या विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधत आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन नुतन वसाहत परिसरातुन संदेश प्रभाकर पाटोळे (रा. शिराळा ता. जाफ्राबाद जि. जालना ह.मु. नुतन वसाहत) यास ताब्यात घेतले. त्यास त्याच्याकडील KTM मोटार सायकल विषयी विचारपुस केली असता, त्याने त्याचा साथीदार सुरज राजु कसबे, (रा.म्हाडा कॉलनी, टी.व्ही सेंटर) याच्या सोबत दोन दिवसापुर्वी पुणे येथील मोरे वस्ती मधुन दोन KTM मोटारसायकली चोरल्या असल्याचे मान्य केले. तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड, पुणे येथुन यापुर्वी देखील आणखी दोन KTM मोटारसायकली व जालना येथुन एक हिरो होन्डा कंपनीची CD डॉन मोटारसायकल चोरी केली असल्याचे मान्य केले. तसेच पुणे येथुन अनेक मोबाईल देखील चोरलेले असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 4 KTM मोटारसायकली,एक हिरो होन्डा कंपनीची CD डॉन मोटारसायकल व 4 मोबाईल असा एकूण 8लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेने आरोपीची माहीती पिंपरी चिंचवड, पुणे येथील अंमलदार यांना दिली आहे. त्यानुसार अनेक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुन्ह्यातील पुढील तपास सदर बाजार पोलीस करित आहेत.
कारवाईत यांनी घेतला भाग - ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे व अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोउपनि प्रमोद बोंडले, अंमलदार सॅम्युअल कांबळे, भाऊसाहेब गायके, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रवि जाधव, धिरज भोसले, कैलास चेके, योगेश सहाने, चालक सुरज साठे, रमेश पैठणे यांनी केली आहे.