जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कर्फ्यू असतानादेखील नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी आता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून कुठे गर्दी झाली आहे, याचे छायाचित्र पोलिसांना बसल्याजागी मिळत असल्यामुळे त्याठिकाणी कार्यवाही होईल. त्यामुळे नागरिकांनो आता सावध व्हा, अन्यथा पोलिसांच्या दांड्याला सामोरे जावे लागेल.
जनता कर्फ्यू, त्यानंतर एक दिवस जनतेने घरात बसणे पसंत केले. मात्र, दुसऱ्या दिवसापासून जनता पुन्हा रस्त्यावर दिसू लागली. वारंवार सांगूनही गर्दी आटोक्यात येत नसल्यामुळे सोमवार आणि मंगळवार दोन दिवस पोलिसांनी बिनाकामाचे फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद दिल्यानंतर काही प्रमाणात या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. मात्र, पोलिसांची गाडी पुढे गेली, की मागे पुन्हा गर्दी होऊ लागली. या गर्दीचा आढावा घेण्यासाठी पोलिसांनी आता ड्रोन कॅमेरा सोडला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील मुख्य चौकातील गर्दी, गल्लीबोळात असणाऱ्या गर्दीचे चित्रीकरण केला जात आहे. या संदर्भातील अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी कारवाई होताना दिसत आहे.
जालना शहरातील नूतन वसाहत आणि रेल्वे स्टेशन भागांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने घेतलेल्या छायाचित्रातून गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना शक्य झाले आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होताना दिसत असून बहुतांशी गर्दीवरदेखील त्याने नियंत्रण ठेवले जात आहे.