जालना - मेंढपाळाच्या शेकडो मेंढ्या शेतात चरत शहराजवळ येत असताना, काही मेंढ्या अचानक रस्त्याच्या कडेला पडल्या. त्यानंतर काही वेळातच त्या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. जवळपास शंभरच्या आसपास मेंढ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून अजूनही काही मेंढ्या अस्वस्थ आहेत. चरत असताना त्यांच्या पोटात विषारी पदार्थ घटक गेल्याने हा प्रकार घडला असावा, असे सांगितले जात आहे.
हेही वाचा - घातवार; दिवसभरात तब्बल चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस
ज्ञानेश्वर बारकू शिंगाडे (रा. कासारी ता. नांदगाव जि. नाशिक) असे मेंढपाळाचे नाव आहे. मेंढ्या शेतात बसवून शेतीला खत मिळते, त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करतात. त्यांच्याकडे शेकडो मेंढ्या असून सोमवारी बरंजळा लोखंडे येथून मेंढ्या घेऊन भोकरदन शहराजवळ येत असताना नांजा पाटीजवळ काही मेंढ्या अचानक चक्कर येऊन खाली पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर संध्याकाळी पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अस्वस्थ असलेल्या मेंढ्यावर उपचार केले. मात्र, काहीवेळाने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही मेंढ्या दगावण्याचे सत्र सुरूच असून आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत शंभरच्या आसपास मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे शिंगाडे यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
शासकीय अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नाहीत...मदतीची मेंढपाळाची मागणी
घटनास्थळी अजूनही मेंढ्या दगावत असून आतापर्यंत एकाही शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचे मेंढपाळ ज्ञानेश्वर शिंगाडे यांनी सांगितले. तसेच मेंढपाळाचे जवळपास दहा लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच मृत मेंढ्यांचे १०० पिल्ली असून त्यांना जगवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. या मेंढ्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मेंढपाळ शिंगाडे यांनी केली आहे.
प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावरच विषबाधेचा उलगडा होईल - डॉ. डी. के. जंजाळ (पशुवैद्यकीय अधिकारी)
घटनेनंतर काही वेळातच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जंजाळ यांच्या पथकाने मेंढ्यांवर उपचार केले. मात्र, अस्वस्थ असलेल्या मेंढ्या वाचू शकल्या नाहीत. आज डॉ. डी. के. जंजाळ, डॉ. उमेश शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉ. रोहित धुमाळ, डॉ. रोहिणी साळवे, डॉ. वि.जे.जाधव, पर्यवेक्षक डॉ. एस.एस.पाटील यांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर सॅम्पल औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले असून त्याचा अहवाल आल्यावरच नेमकी कशामुळे विषबाधा झाली हे समजेल, असे त्यांनी सांगितले.