जालना - पावसाळा सुरू होऊन महिना होत आला तरी अद्याप पाहिजे तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील पावसाचे अत्यल्प प्रमाण पाहता विविध संघटनांच्यावतीने आज शनिवारपासून शहरातील पंचमुखी महादेव मंदिरात पर्जन्य यज्ञाला सुरुवात करण्यात आली आहे.
आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास या यज्ञाला सुरुवात झाली. रविवारी सायंकाळपर्यंत हा यज्ञ सुरू राहणार आहे. समस्त महाजन ट्रस्टच्या विश्वस्त नूतन देसाई, घाणेवाडी जलसंरक्षणचे अध्यक्ष रमेश भाई पटेल, आनंदनगरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शंभर रुपये सोशल क्लब, गोरक्षण पांजरपोळ आणि जैन संघटना अशा अनेक संघटनांनी एकत्र येऊन या पर्जन्य यज्ञाचे आयोजन केले आहे.
आज या यज्ञाच्या प्रारंभी रमेश भाई पटेल यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी सुनील रायठ्ठा हेदेखील उपस्थित होते. तसेच नूतन देसाई, नरेंद्र जोगड, पुसराम मुंदडा ,उदय शिंदे यांचीही यावेळी उपस्थिती होती.