जालना - बिहारमध्ये मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनामुळे मिळाले आहे. भाजप सरकारने आतापर्यंत केलेल्या विकासाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत. म्हणून बिहारच्या जनतेने विकासाला मत दिले. अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी पाणीपुरवठा तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली.
नियोजनाचे श्रेय फडणवीसांना -
बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून सर्व जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. त्यांनी केंद्राच्या आणि राज्याच्या कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या. तसेच बिहारमधील भ्रष्टाचार, गुंडगिरी या सर्वांवर फडणवीस यांनी प्रहार केला.
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील विकास योजना जनतेला सांगितल्या. त्यामुळे जनतेने विश्वास ठेवून विकासाला मतदान केले आहे.
बिहारच्या जनतेने विकासाला साथ दिली -
खरेतर ज्या संस्थांनी निकालाचे सर्वे केले होते. ते सर्व सर्वे हे एनडीएच्या विरोधात होते. बहुमत मिळणार नाही अशीचं चर्चा होती. मात्र त्या सर्वेला बिहारच्या जनतेने मोडीत काढले. जनतेने गुंडगिरीच्या विरोधात, चारा घोटाळ्याच्या विरोधात, मतदान करून विकासाला साथ दिली आहे. असेही बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
हेही वाचा- पहिले दाऊदचा बाप काढायचे, मग नवाज शरीफचा, आता हिंदुत्व गेल्याने आमचा बाप काढावा लागतो..