जालना - तालुक्यातील रेवगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती फाउंडेशनच्यावतीने जवानांच्या पालकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमामुळे जवानांचे पालक तर भारावून गेले शिवाय परिसरातही या फाउंडेशनचे कौतुक होत आहे.
रेवगावमधील काही तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती फाउंडेशन या नावाने एक संघटना उभी केली. शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याऐवजी देशासाठी आपले प्राणपणाला लावणाऱ्या जवानांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. या वर्षीच्या शिवजयंती मिरवणुकीवर दहशतवादी हल्ल्याचे पडसाद होते. प्रत्येक शिवभक्ताचा चेहऱ्यावर वीरमरण आलेल्या जवानांबद्दल आपुलकी होती. यामुळे या उपक्रमाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
सत्कार करण्यात आलेल्या जवानांच्या आई-वडिलांमध्ये सत्यभामा पंढरीनाथ कदम, शोभा बंडू गायकवाड, चंद्रकला लक्ष्मण कापसे, कासाबाई घनश्याम काळे, आणि चंद्रकला विष्णू कुमकर यांचा समावेश होता. सन्मानचिन्ह आणि फुलझाड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अॅड. निवृत्ती मदन, दिलीप पोहनेरकर, सुनील सुलताने, बापूराव गोलडे, बाबुराव कदम, ह.भ.प. विष्णु महाराज बारड यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती फाऊंडेशनच्या संतोष शिंदे, ऋषी मोहिते, दत्ता मुळक, डॉक्टर शिवाजी गोलडे, रंजीत शेळके, आदींनी परिश्रम घेतले होते.