जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने विविध प्रकारच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या भरतीपैकी सोमवारी दिनांक 1 फेब्रुवारीला 104 कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढले आहेत. तीन महिन्यांच्या कालवधीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही भरती करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आतापर्यंत या कर्मचाऱ्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्यात आली, मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिले आहेत.
'गरज सरो वैद्य मरो'
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. कोरोना काळात कुटुंबातील लोक देखील एक दुसऱ्याला हात लावत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये या कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांची सेवा केली. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे. 'गरज सरो वैद्य मरो' अशी आमची अवस्था झाल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बुधवारपासून उपोषण
सेवा समाप्ती केलेल्या 104 कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, पूर्वीप्रमाणे सेवेत घ्यावे अशी मागणी केली आहे. अन्यथा येत्या बुधवारपासून उपोषण करणार असल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. या 104 कर्मचाऱ्यांमध्ये 11 डॉक्टर, 89 आरोग्य परिचारक (स्त्री आणि पुरुष) एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 2 ईसीजी तंत्रज्ञ आणि एका फार्मासिस्ट यांचा समावेश आहे.