जालना - जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण सापडला त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षात तब्बल ५२४ जणांचा बळी या कोरोनाने घेतला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. या वर्षभरात कोरोनामुळे जालना जिल्ह्यात काय बदल झाले आणि लोकांवर कोरोनाचे काय परिणाम झाले, याचा हा ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा...
हे झालेत बदल -
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दोन नवीन ऑक्सीजन प्लांट उभे राहिले. गेल्या अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या इमारती नवीन रंग रंगोटी करुन कोविड रुग्णांसाठी कामाला आल्या. सामान्य रुग्णालय परिसर पूर्णपणे कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्यामुळे येथील सामान्य रुग्णालय गांधीचमन परिसरातील स्त्री रुग्णालयाच्या परिसरात हलविण्यात आले. कोविडच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्र काम करून तब्बल दोन महिने लढा दिला आणि जालन्यातील बेघर लोकांना अन्नपुरवठा केला. आरोग्य सेवेचा अभ्यास असणाऱ्यांच्या हाताला काम मिळाले. दरम्यान दुसरीकडे अनेकांच्या हाताचे काम देखील गेले. औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आणि 19 कामगारांना आपला जीव गमवावा लागला.
शासनाची सर्वच यंत्रणा कोरोनाचे नियम पाळण्यासाठी ओरडत होती. मात्र जनता काही नियम पाळण्यासाठी धजावत नव्हती. याचा परिणाम 5 एप्रिल 2000 ला 60 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली आणि जालनेकर अस्वस्थ झाले. त्यानंतर कोरोनाचा हा आलेख चढतच राहिला. आजपर्यंत या महामारीच्या विळख्यात सापडलेल्या 524 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान प्रशासनासाठी देखील हा नवीनच आजार असल्यामुळे प्रयोगावर प्रयोग सुरू होते. निश्चित दिशा ही का मिळत नव्हती, त्यामुळे येईल त्या परिस्थितीशी तोंड देत प्रशासनाने या महामारीला तोंड दिले. सरत्या वर्षा सोबत ही महामारी देखील संपून जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र तो केवळ भ्रम ठरला. फेब्रुवारी महिन्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या महामारीने पुन्हा तोंड वर काढले आणि मागील वर्षापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण करून ठेवली. यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. लोकांच्या मनात भीती तर आहे मात्र चिंता नाही. कारण चिंता करून काही उपयोग नाही, घरात बसावे तर उपाशी मारायची वेळ आणि बाहेर जावे तर कोरोनाची महामारी. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आता कोरोनाशी तोंड देत आहे.
मागील वर्षभराची आकडेवारी -
जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख 17 हजार 570 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 28 हजार 499 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. ही सरासरी 13 टक्के आहे, तर पॉझिटिव्ह असलेल्या 28 हजार 499 रुग्णांपैकी तेवीस हजार एकशे 36 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. 524 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 406 रुग्ण हे सामान्य रुग्णालयात तर 118 रुग्ण हे खाजगी रुग्णालयात मृत पावले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - राज्यात सोमवारी 47 हजार 288 कोरोनाबाधितांची वाढ; 155 मृत्यू