जालना- बदललेल्या जीवनशैलीमुळे सामान्य माणसाला शंभरी गाठणे अवघड झाले आहे. मात्र, 107 वर्षाच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. आजीबाई संपूर्ण परिवारासह कोरोनामुक्त होऊन त्या पुन्हा सुखरुप घरी पोहोचल्या आहेत. कोविड रुग्णालयातून घरी जात असताना आजींच्या मुलाला मात्र आनंदाने भरुन आले होते. आई जिवंत घरी येईल का याची खात्री नव्हती, पण डॉक्टरांच्या प्रयत्नाने ती बरी झाली, अशा भावना त्यांच्या मुलाने व्यक्त केल्या आहेत.
107 वर्षांच्या आजी 11 ऑगस्ट रोजी कोविड रुग्णालयात भरती झाल्या होत्या. त्यांच्यासोबतच त्यांचा मुलगा, त्यांची विवाहित मुलगी नातू, पणतू असे एकूण एकाच परिवारातील पाच जण रुग्णालयात भरती झाले होते. दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजीबाईंना इतर कुठलाही आजार नसल्यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली. आज त्या आजींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जालना जिल्ह्यातील शंभर वर्षापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला होता. हा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि आजीबाईंना निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय जगताप, तसेच या रुग्णांवर उपचार करणारे डॉ. आशिष राठोड आणि त्यांची टीम उपस्थित होती.