जालना - जिल्ह्यात कोरोनावरील लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. कोव्हिशिल्ड ही पहिली लस सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक पद्मजा सराफ आणि कोरोनाचे विभाग प्रमुख डॉ. संजय जगताप यांना देण्यात आलेली आहे. या दोन्ही डॉक्टरांची तब्येत ठणठणीत आहे. हे डॉक्टर आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.
कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम देशभरासह जिल्ह्यात 16 जानेवारीला सुरू झाला.
शनिवारी 63 लाभार्थ्यांना लस
जिल्ह्यात शनिवारी (16 जानेवारी) लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी 100 लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे केवळ 63 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. उर्वरित 37 लाभार्थ्यांना आता शासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण उद्यापासून सुरू होणाऱ्या लसीकरणामध्ये पुन्हा 100 जणांनाच लस देण्यात येणार आहे.
हेही वाचा-मुंबईत लसीकरणाला सुरळीत सुरुवात, कोविन अॅपमध्येही सुधारणा
मंगळवारपासून पुन्हा लसीकरण
ज्या ठिकाणी ऑफलाइन लसीकरण होते, अशा ठिकाणी नियोजित लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड ही लस देण्यात आली. मात्र , जालना येथील कोरोना रुग्णालयात कोव्हिन ॲपमध्ये अडचण आल्याने हे लसीकरण थांबविण्यात आले होते. हे लसीकरण पुन्हा सुरू झाले आहे. मंगळवार बुधवार आणि शुक्रवार शनिवार असे आठवड्यातून चार दिवस हे लसीकरण होणार आहे.
हेही वाचा-अहमदनगर : कोविड लस घेतलेल्या तीन आरोग्य सेविकांना त्रास, आयसीयूमध्ये उपचार सुरू
लशीचा थोडा परिणाम होणारच
लस घेतलेल्या सर्वच लाभार्थ्यांची प्रतिकार क्षमता सारखी नसते. त्यामुळे अंग दुखणे व थोड्याफार प्रमाणात ताप येणे हे प्रकार होतात. तसाच प्रकार काहीजणांना ही लस घेतल्यामुळे झाला असेल. असा त्रा होऊ शकतो, मात्र कोणतेही भीतीचे कारण नाही. मात्र, लस घेणे टाळू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
लस टाळणे हा पर्याय नाही-
सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक पद्मजा सराफ म्हणाल्या, की माझी तब्येत ठणठणीत आहे. कोणताही त्रास झालेला नाही. खूप आनंदी आहे. काहीजणांना किरकोळ त्रास झाला. मात्र, गंभीर त्रास कोणालाही झाला नाही. लहा मुलांच्या लसीकरणात ताप येतो. मात्र, लस टाळणे हा पर्याय नाही. समाजाला व आपल्यालाला सुरक्षितता मिळविण्यासाठी कोरोनावरील लस आवश्यक आहे.