जालना - लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा बदनापूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे. वर्षाला ६ हजार रुपये मिळण्याच्या आशेने कित्येक शेतकऱ्यांनी अर्ज भरल्यानंतरही अद्याप त्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने ही घोषणा फसवी वाटत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने 'पंतप्रधान सन्मान योजना' जाहीर केली होती. या योजनेतंर्गत १ हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येणार होते. संपूर्ण देशात ही योजना सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमाही झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक गावातील तलाठ्यामार्फत या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. वर्षात तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार असे वर्षाला सहा हजार रुपये मिळणार या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनीही अर्ज भरून दिले. वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार होते. मात्र, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजून एकही रुपया या योजनेअंतर्गत जमा न झाल्याने शेतकरी योजनेपासून वंचित तर राहणार नाही ना? अशी शंका व्यक्त होत असून ही घोषणाही निवडणुकीनंतर फसवी ठरत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
हेही वाचा - शासनाने कापूस खरेदी सुरू करावी; शेतकऱ्यांची मागणी
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ देण्याच्या उद्देशाने तलाठ्यामार्फत शेतकऱ्यांकडून शेतकरी सन्मान योजनेचे फॉर्मसुद्धा भरून घेतलेले होते. त्या अर्जात आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक मागविण्यात आले होते. लोकसभा निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळाले असल्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज भरून दिले होते. परंतु, नंतर अर्ज भरलेल्या तालुक्यातील काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जमा झाले, पण बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शासनाच्या विरोधात शेतकरी तीव्र रोष व्यक्त होत आहे.
हेही वाचा - डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा दिशाभूल करणारा; शासन दरबारी 49, प्रत्यक्षात विविध रुग्णालयात 50-50 रुग्ण
बदनापूर तालुक्यातील शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित आहेत. अर्ज भरूनही पैसे न मिळाल्याने या योजनेत नेमकी काय अडचण आहे, हे मात्र न उलगडणारे कोडे असून ऐन लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सुरू केलेली ही योजना आता बंद झाली की काय? अशी शंका शेतकरी व्यक्त करत आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते, परंतु, निवडणुकानंतर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप एक रुपयाही जमा झालेला नसल्यामुळे ही योजना इलेक्शन फंडा तर नव्हती ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे.