जालना : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून आज(बुधवार) त्यात आणखी 26 रुग्णांची भर पडली आहे. या रुग्णांपैकी सर्वाधिक 21 रुग्ण हे जालना शहरातील आहेत. त्यामुळे शहरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात जालना शहरातील 21 रुग्णांची संख्या आहे. यामध्ये बुऱ्हाणनगर येथील तीन, कसबा जुना जालना, गुरु गोविंद नगर, या भागातील प्रत्येकी दोन तर संभाजीनगर, जेपीसी बँक कॉलनी, कन्हैया नगर, औद्योगिक वसाहत, बालाजी नगर, महावीर चौक, साईनगर, दाना बाजार, कादराबाद, तट्टूपुरा, बागवान मस्जीद, निवांत हॉटेलमागे, विकास नगर, नेहरू रोड, अंबर हॉटेल जवळील भाग, या ठिकाणी प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर, उर्वरित रुग्ण हे अंबड तालुक्यातील एकलहरा, रोहिलागड, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील आहेत.
जालना जिल्ह्यात उपचार घेत असलेल्यांपैकी भोकरदन येथील दोघांचादेखील समावेश आहे. तर, जालना शहरात कालपर्यंत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद शासनदरबारी करण्यात आली आहे. दरम्यान, नवीन आणि जुना जालना अशा दोन्ही भागातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने नुकतेच कुंडलिका नदीवरील चारही पूल बंद केले होते. मात्र, नागरिकांनी यापैकी देहेडकर वाडी येथील पुलावरील बंद केलेला रस्ता नागरिकांनी स्वतःहून सुरू केला. त्यामुळे प्रशासन देखील आता हतबल झाले आहे.