जालना - राष्ट्रीयकृत बँकांमध्ये परप्रांतीयांची भरती झाल्यामुळे कर्ज वाटपात अडथळे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात फक्त ११ हजार तरुणांनाच कर्ज वाटप करता आले. अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील यानी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहांमध्ये आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी आमदार संतोष दानवे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड आणि अन्य पदाधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, की जालना जिल्ह्यातील परिस्थिती ही समाधानकारक नाही. या अडचणी संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत तिथे परप्रांतीयांची भरती झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या आणि आपल्या भाषेतील समन्वय यामुळे हे कर्ज वाटप अडखळले आहे. महाराष्ट्रामध्ये 50 हजार आणि जालन्यात पाच हजार तरुणांना कर्ज वाटप करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता महाराष्ट्रमध्ये 11 तर जालन्यात फक्त पाचशे तरुणांनाच याचा लाभ मिळाला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत साडे 500 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. मात्र, एकही प्रकरण बोगस असल्याचे समोर आलेले नाही. कर्ज वाटपात ही दरी आपण भरून काढणार असल्याचेही ते म्हणाले. कर्ज वाटपामध्ये इतर महामंडळाच्या तुलनेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे एक नंबरवर असल्याचेही ते म्हणाले.