जालना - भोकरदन नगर परिषद प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्याचा निर्णय घेत दोन दिवसात तब्बल 25 हजार रुपयांची दंड वसूल केली आहे. लॉकडाऊनमध्ये मास्क लाऊन न फिरणे, विनाकारण फिरणारे, सोशल डिस्टन्स न ठेवणारे अशा विविध नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन नगर परिषदेकडून यापूर्वीच करण्यात आले होते. यामुळे नागरिक घरातच थांबतील असा उद्देश ठेवून दंडाचे परिपत्रक ही काढण्यात आले होते हे विशेष.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 1000 रुपये दंड व फौजदारी गुन्हा, नाक सुरक्षित न ठेवणे 200, मास्क न लावणे 500, सोशल डिस्टन्स न ठेवणे 200, दर पत्रक न लावणे 5000 रुपये दंड, विनाकारण फिरणे 100 रुपये दंड आकारण्याच्या सूचना गेल्या काही दिवसांपासून शहरात रिक्षाद्वारे पालिका प्रशासन देत होते. मात्र, याचे पालन होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दि 17 व 18 एप्रिलला प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी 15000 तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18 ला तब्बल आठ हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आले असल्याची माहिती नगर परिषदच्या वतीने देण्यात आली. ही कारवाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यात बबन जाधव, विश्वजित गवते, भूषण पालसपगर, पंजाबराव जाधव, बजरंग घुळेकर, परशराम ढोके, शशिकांत सरकते, सिद्धू गायकवाड, सलीम शेख आदीं पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.