जालना- शेतीच्या वाटणीवरुन नातेवाईक आणि आईसोबत वारंवार भांडण करणाऱ्या मुलाचा आईनेच खून केल्याची घटना घडली होती. ही घटना काल सोमवारी उघडकीस आली. घटनेनंतर तरुणाचा मृतदेह दोन ठिकाणी पुरुन टाकून मुलाच्या आईने मुलगा गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. हा सर्व प्रकार शीघ्र कृती दलाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे.
हेही वाचा-चेंबूर येथे बलात्कार झालेल्या जालन्याच्या 'त्या' पीडितेचा मृत्यू
सोमवारी बदनापूरचे तहसीलदार, संबंधित विभागाचे डॉक्टर, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, यांच्या उपस्थितीमध्ये मृतदेह उकरुन त्याची उत्तरीय तपासणी करुन अंत्यविधी करण्यात आला. शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना गुप्त माहिती मिळाली होती. मांडवा येथील गवळीवाडी इथे राहणारा गणेश कोंडीआप्पा अलंकार याचा 27 तारखेला त्याच्या नातेवाईकांनी आणि आईने मिळून खून केला. मृतदेह राजाभाऊ अंभोरे यांच्या शेतात पुरला. हाच मृतदेह पुन्हा उकरुन सिंधी पिंपळगाव शिवारात चितोडा नदीच्या पश्चिम कोपऱ्यात पुरला. माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह, बाबासाहेब बोरसे, नामदेव नागरे, नंदू खंदारे, सुभाष पवार, बदनापूर चे तहसीलदार तसेच संबंधित विभागाचे डॉक्टर यांनी काल चितोडा नदीच्या काठावर पुरुन ठेवलेला तो मृतदेह उकरुन काढला.
दरम्यान, या पाच सहा दिवसांमध्ये गणेश यांची आई राधाबाई कोंडीआपा अलंकार यांनी आपला मुलगा गायब झाल्याची तक्रार चंदनजीरा पोलीस ठाण्यात दिली. 27 तारखेला भटू धोंडू झिपरे, भगवानआप्पा सटवा, आप्पा अलंकार, सचिन सदाशिवआप्पा अलंकार, बाळू तुकाआप्पा अलंकार, गणेशची आई राधाबाई कोंडीआप्पा अलंकार यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास गणेशला मारहाण करुन त्याला जिवे मारले. त्याचा मृतदेह रात्रभर घरातच ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा मृतदेह गावाजवळीलच रामभाऊ अंभोरे यांच्या शेतात पुरला. सकाळी पुरलेला हा मृतदेह दुपारच्या वेळेस उकरुन सिंधी पिंपळगाव चितोडा नदीच्या काठावर पुन्हा पुरुन टाकला होता. हा मृतदेह पुन्हा काल पोलिसांनी उकरुन काढून त्याची विल्हेवाट लावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मांडवा तालुका बदनापूर येथील पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.