बदनापूर (जालना) : बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव शिवारात घरातून निघून गेलेल्या आई आणि लहान मुलाचा मृतदेह बुधवारी (ता. 22) सकाळी स्वतःच्या शेतातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत 25 वर्षीय विवाहित महिला तिच्या पाच वर्षाच्या मुलासह मंगळवारी (ता. 21) सकाळी 7 वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, या प्रकरणी बुधवारी (ता. 22) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, बदनापूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
हेही वाचा - वडगाव मावळमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकावर गोळीबार; पोटात तीन गोळ्या लागल्या
बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव शिवारातील शेतातील घरात राहणाऱ्या गोदावरी बाळासाहेब नन्नवरे (25) व त्यांचा मुलगा सार्थक बाळासाहेब नन्नवरे (5) दोघे मंगळवारी राहत्या घरातून निघून गेले होते. या संदर्भात त्यांचे पती बाळासाहेब गोरखनाथ नन्नवरे (30) यांनी मंगळवारी (ता. 21) सायंकाळी बदनापूर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात केली होती. मात्र, बुधवारी (ता. 22) सकाळी आई गोदावरी व मुलगा सार्थक यांचा मृतदेह स्वतःच्या शेतातील विहिरीत तरंगताना दिसून आला. याबाबत बाळू बबनराव नन्नवरे (रा. देवपिंपळगाव) यांच्या माहितीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर, फौजदार पूजा पाटील, सहाय्यक फौजदार इब्राहिम शेख, निवृत्ती शेळके, बी जी खंडागळे, नितीन ढिलपे, गजानन जारवाल, अनिल चव्हाण या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. तसेच घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, दोघा माय-लेकरांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तालुक्यातील शेलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, काळजाला चटका लावणाऱ्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार आत्महत्या की घातपात, याबाबत बदनापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - चिंताजनक! 'हा' आजार करतोय कोरोनाग्रस्त मुलांचे अवयव निकामी
दरम्यान, या महिलेच्या माहेरकडील मंडळींनी सदरील महिला व मुलास सासरकडील मंडळींनी मारहाण केल्यामुळेच मृत्यू झाला असा गुन्हा नोंद करण्याची मागणी करत सेलगाव येथील आरोग्य केंद्राजवळ मोठी गर्दी केली होती. त्यातच सदरील महिला व बालकाची उत्तरीय तपासणी सेलगाव आरोग्य केंद्रात झाल्यानंतरही सासरकडील कोणीही पार्थिव घेण्यास न आल्याने जवळपास दोन ते तीन तास सदरील मृतदेह आरोग्य केंद्रातच होते.