भोकरदन (जालना)- घरातून बेपत्ता झालेल्या ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आल्याची घटना पेरजापूरमध्ये घडली आहे. ज्ञानेश्वर भानुदास जाधव असे मृत मुलाचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा गुरुवारी दुपारी चार वाजता घरातून बेपत्ता झाला होता. मात्र आज पेरजापूर सुभानपूर शिवारातील एका शेततळ्यात मृतदेह आढळून आला आहे.
वडिलांनी दिला मुलाला दम-
ज्ञानेश्वर याने गुरुवारी दुपारी गावातील हौदात पोहण्यासाठी हट्ट धरला होता. त्या कारणाने वडील भानुदास जाधव यांनी थंड पाण्यामध्ये अंघोळ करू नकोस, तुला सर्दी होईल आजारी पडशील असे समजावले होते. तरीही तो हट्ट करत असल्याने त्याच्या वडिलांना त्याला रागावून मनाई केली होती. मात्र, तो राग मनात धरून ज्ञानेश्वर घरातून बाहेर गेला होता. सायंकाळी देखील तो घरी परत न आल्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. मात्र रात्री देखील तो घरी परतला नाही. त्यानंतर ज्ञानेश्वर हा गायब झाल्याची चर्चा गावात पसरली. त्यानंतर गावकऱ्यांनी शोध घेऊन ज्ञानेश्वर हरविल्याची माहिती देखील पोलिसांना दिली.
शेततळ्यात आढळून आला मुलाचा मृतदेह-
गुरुवार पासून ज्ञानेश्वरचा शोध सुरूच होता. आज पेरजापूर सुभानपूर शिवारात असलेल्या गावातीलच शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह बाहेर काढून त्याच ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. ज्ञानेश्वर यास एक मोठा भाऊ आहे. घडलेल्या या घटनेमुळे पेरजापूर परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.