जालना - वारंवार होणाऱ्या नुकसानामुळे शेतीचे पंचनामे होण्यास विलंब झाल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. अशी परिस्थिती आत्तापर्यंत तीन वेळा निर्माण झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत हवामान खाते अंतिम अंदाज सांगत नाही, तोपर्यंत पंचनामे करता येणार नाही, असे ते म्हणाले.
सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार असून त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याचे पर्याय मुख्यमंत्री शोधत आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत,असे सत्तार म्हणाले. यासाठी राज्यसरकार उत्पन्नाचे स्रोत निर्माण करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
विधान परिषद निवडणूक आणि 'टायगर'
जालन्यातील टायगर अभी जिंदा है, असे म्हणत येणाऱ्या विधान परिषदेच्या जागांसाठी कंबर कसल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तरी मागच्या वेळी मला अपयश आले, मात्र यावेळी निश्चित यश येईल, असे म्हणत त्यांनी मंत्री अर्जुन खोतकरांच्या विधान परिषदेच्या जागेबद्दल हिरवा झेंडा दाखवला. मराठवाड्याला 'टायगर'ची गरज आहे, असे ते म्हणाले. मात्र पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहणार असून राजकारणाच्या रुपरेषा आणि दिशा ठरवूनच ते निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले. निवडणुकीत जागांसाठी अनेकजण उत्सुक असतात. प्रत्येकाला तिकीट देणं शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या बंगल्यावर पाहुणचार घेतल्यानंतर सत्तार पुढील दौऱ्याला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
रावसाहेब दानवे आणि पक्षप्रवेश
भाजपाचे केंद्रातील राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील येणाऱ्या काळात कोणत्या पक्षात असतील ते लवकरच कळेल, असे म्हणत सत्तार यांनी नव्या चर्चेला तोंड फोडलंय. सध्या भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा सुरू आहे. यावर बोलताना त्यांनी जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरही निशाणा साधला.