जालना - कोरोनामुळे जमावबंदीचा आदेश लागू आहे. त्यामुळे नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळीही ही एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे पूर्व नियोजित विवाह रद्द न करता, आज (मंगळवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घरच्या घरी विवाह करण्याचा पायंडा येथील रत्नपारखे आणि शेजवळ परिवाराने पाडला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा संघटक बबनराव रत्नपारखे यांची मुलगी निता आणि सेवानिवृत्त कर्मचारी अर्जुन शेजवळ यांचा मुलगा अमोल यांचा विवाह तीन महिन्यांपूर्वीच निश्चित झाला होता. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे हे लग्न करायचे कसे? ही चिंता देखील परिवाराला सतावत होती. त्यातच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे या दोन्ही परिवारांनी घरच्या घरी हा विवाह लावण्याचे ठरवले. आणि आज हा विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे लग्नातील अवाढव्य खर्चही वाचला आणि आणि लॉकडाऊन मधील नियमांचे उल्लंघनही झाले नाही. सामाजिक अंतर पाळून वधू-वरांच्या आई वडिलांसमक्ष हा विवाह पार पडला.